भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले चढवले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांवरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
देशात मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉबिंग ऑपरेशन करायला पाहिजे
advertisement
राज ठाकरे म्हणाले, पहलगामला ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी मी पहिल्यांदा ट्विट केले होते की ज्यांनी हल्ला केला त्यांना कठोरातले कठोर शासन झाले पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नसते. अमेरिकेमध्ये दोन ट्विन्स टॉवर पाडले, म्हणून त्यांनी तिकडे जाऊन काही युद्ध केले नाही. त्यांनी ते अतिरेकी शोधून ठार मारले. देशात युद्धजन्य परिस्थिती आणायची, मॉक ड्रिल करायचं सायरन वाजवायचे, हे काय सुरू आहे... असे राज ठाकरे यांनी विचारले.
पहलगामला हजारो पर्यटक जातात, तिथे सुरक्षा का नव्हती? एअर स्ट्राइक करून लोकांची मने भरकटवू नका
मुळात ही गोष्ट का घडली? इतकी वर्षे पहलगामला हजारो पर्यटक जातात, तिथे सुरक्षा का नव्हती? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. अगोदरच बरबाद झालेल्या देशाला आपण काय बरबाद करणार? ज्यांनी हल्ला केला ते तरी अजून सरकारला सापडले आहेत का? आपल्या देशात मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉबिंग ऑपरेशन करायला पाहिजे. एअर स्ट्राइक करून लोकांना अशा मुद्द्यावरून भरकटवून मूळ विषयाला आपण हात घालत नाही आहोत. असले हल्ले हे पर्याय होऊ शकत नाही, असे राज ठाकरे कठोरपणे म्हणाले. त्याचवेळी सरकारच्या चुका योग्यवेळी दाखवल्याच पाहिजेत, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांनाही लक्ष्य केले
ज्यावेळी पहलगामचा हल्ला झाला, त्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियामध्ये होते. त्यांनी तो दौरा अर्धवट सोडला. नंतर ते बिहारमध्ये एका सभेला गेले. तिथून त्यांनी मुंबईत एका चित्रपटविषयक कार्यक्रमाच्या समारंभाला हजेरी लावली. पुन्हा ते अदानीच्या बंदराच्या उद्घाटनाला गेले. तर देशात एवढी गंभीर परिस्थिती होती तर पंतप्रधान मोदींना या सगळ्या गोष्टी टाळता आल्या असत्या, असे म्हणत त्यांनी मोदींनाही लक्ष्य केले.