लग्नापासूनच पैशांसाठी तगादा
तक्रारदार महिला परेल भागातील रहिवासी असून २०१७ मध्ये तिचा विवाह झाला होता. लग्नावेळी तिच्या वडिलांनी १००० ग्रॅम सोनं आणि विवाहासाठी ४० लाख रुपये खर्च केला होता. मात्र, लग्न झाल्यापासूनच पती आणि सासरच्या लोकांनी 'कमी सोनं दिलं' असं म्हणत हिणवण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, संसार सुरळीत चालवण्यासाठी पीडितेच्या वडिलांकडून दर महिन्याला दीड लाख रुपये घरखर्च म्हणून घेतले जात होते.
advertisement
४ BHK फ्लॅट साठी दबाव
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, सासरच्या मंडळींची हाव इथेच थांबली नाही. सासरच्यांनी ४ BHK फ्लॅट घेऊन देण्याचा दबाव टाकला. पीडितेच्या वडिलांनी आतापर्यंत चेकद्वारे ३९ लाख रुपये दिले. तसेच इतर कोट्यवधी रुपये रोख स्वरूपात दिल्याचं तक्रारीत नमूद आहे.
धक्कादायक बाब म्हणजे एवढं करुनही तक्रारदार महिलेचा पतीचं दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब पीडितेला समजल्यानंतर तिने जाब विचारला असता तिला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी पती पीडितेकडून घेतलेले दागिने महागड्या वस्तू आपल्या प्रेयसीला द्यायचा, असंही तक्रारीत म्हटलं आहे.
अखेर पतीच्या जाचाला आणि सततच्या आर्थिक शोषणाला कंटाळून पीडित महिला आपल्या मुलासह माहेरी परतली आहे. तिने काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ आणि फसवणुकीची तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे.
