मुंबई आणि कोकणच नाही तर उर्वरित महाराष्ट्रातही भयानक स्थिती आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. धरणं भरल्याने दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. विदर्भातही अति मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला. रस्त्यांना नदीचं रुप आलं, लोकांच्या घरात, शेतात पाणी शिरलं. त्यामुळे शेतकरी आणि लोकांचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
इतके दिवस विश्रांती घेतलेला पाऊस अचानक आला, मात्र मागच्या 24 तासात असं काय घडलं ज्यामुळे पावसाचा जोर वाढला. अचानक ढगफुटीसदृश्य पाऊस येण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबतची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील हवामान तज्ज्ञ शुभांगी भुते यांनी दिली आहे. अशा प्रकारे पडणारा पाऊस किती दिवस राहणार त्याचा धोका किती आहे याचे अपडेट देखील त्यांनी दिले आहेत.
शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून सतत धो- धो पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्याच सोबत ईस्ट वेस्ट शेअर झोन तयार झाला आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. संयुक्त प्रभाव म्हणून मुंबईसह कोकण आणि राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे. पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे.
समुद्रकिनारी उंच लाटा उसळत आहेत. आज पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून इतर ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर या दोन जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यातही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 19 ऑगस्ट रोजी देखील मुंबई ठाण्यासाठी पालघर, नाशिक, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
Nanded Flood : नांदेड: साखरझोपेत असताना आभाळ फाटलं, नदीला पूर, शेती गेली, मायमाऊलींच्या डोळ्यात पाणी
मुंबईची तुंबई झाली तर कोकणात नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. हाच धोका आणखी 48 तास राहील त्यानंतर पाऊस हळूहळू कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे.