भाजपाचा ८०-८५ जागांचा नवा प्रस्ताव
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने शिवसेनेला ८० ते ८५ जागांचा प्रस्ताव दिला आहे. उर्वरित जागांवर भाजपा स्वतः उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत सन्मानजनक जागा मिळाव्यात, यासाठी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला आहे. त्यामुळे हा आकडा १०० च्या आसपास नेण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. किमान ११२ जागा मिळाव्यात यासाठी शिंदे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
advertisement
बैठकीत काही जागांबाबत एक वेगळाच फॉर्म्युला चर्चेत आला आहे. ज्या जागांवर शिवसेनेची ताकद आहे, पण प्रबळ उमेदवार नाही, अशा ठिकाणी भाजपाचा ‘आयात उमेदवार’ शिवसेनेला देण्याबाबत चर्चा झाली आहे. म्हणजेच उमेदवार भाजपाचा असेल, पण तो शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवेल. यामुळे शिवसेनेला जागांचा आकडा वाढवता येईल आणि भाजपाला आपली माणसे निवडून आणता येतील. ज्या जागांवर उमेदवार आयात केल्याशिवाय विजय सोपा नाही, अशा ठिकाणी हा फॉर्म्युला राबवला जाण्याची शक्यता आहे.
मध्यरात्रीची बैठक आणि पुढची रणनीती
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत काही वादग्रस्त जागांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. मुंबईत आपली पकड मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना किमान ११२ जागांची अपेक्षा आहे, मात्र भाजपाने सध्या ८० ते ८५ जागांवर मर्यादित राहण्याचा प्रस्ताव दिल्याने शिंदे सेनेची धाकधूक वाढली आहे. त्यांना १०० च्या आत जागांवर समाधान मानावं लागू शकतं, अशाही चर्चा आहेत.
