नागपूर: गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नागपूरच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत सहा जणांना अटक केली आहे. आरोपीत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्याचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. वैभव काळे असे या पदाधिकार्याचे नाव आहे. तो भाजपचा सरपंच देखील आहे.
advertisement
अमली पदार्थविरोधी पथक (एनडीपीएस सेल) आणि काटोल पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन राबवत, शहाळ्यांच्या टोपलीतून गांजा वाहतूक केल्याचे धक्कादायक रॅकेट उघड केले. या कारवाईत भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) काटोल ग्रामीण अध्यक्षासह सहा जणांना ताब्यात घेतले असून, दोन जण फरार आहेत.
मंगळवारी (२५ नोव्हेंबर) पहाटे काटोल शहरात करण्यात आलेल्या या छाप्यात पोलिसांनी तब्बल ३३.६० किलो गांजा हस्तगत केला. बाजारभावानुसार या अमली पदार्थाची किंमत सुमारे ६ लाख ७२ हजार रुपये असून, वाहन, मोबाईल, साहित्य मिळून एकूण १७ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
अटकेतील मुख्य आरोपींपैकी वैभव दिलीप काळे हा डोरली (भांडवलकर) गावाचा विद्यमान सरपंच असून, भाजपच्या भारतीय जनता युवा मोर्चाचा काटोल ग्रामीण मंडळ अध्यक्ष आहे. त्याची नियुक्ती काही महिन्यांपूर्वीच भाजपचे काटोल ग्रामीण अध्यक्ष प्रवीण अडकिने यांनी केली होती.
तर दुसरा प्रमुख आरोपी समीर विजय राऊत हा ‘शेर भगतसिंग’ या सामाजिक संघटनेचा नरखेड तालुक्यातील पदाधिकारी असल्याचे समोर आले. दोघेही या भागातील मोठे पुरवठादार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रकरणात राजकीय दबाव वापरण्याचा प्रयत्न झाल्याची माहितीही तपासात समोर येत आहे.
ओडिशा कनेक्शन....
आरोपींनी सदर गांजा ओडिशातील बालंगीर परिसरातून आणल्याचे चौकशीत समोर आले आहे. आरोपी छगन चरपे, सचिन झोड, विशाल सेंबेकर आणि सूरज सुपटकर हे चौघे एका वाहतुकीच्या वाहनावर ‘मजूर’ म्हणून गेले होते. त्याच वाहनातून गांजाची मोठी खेप नागपूर जिल्ह्यात आणण्यात आली.
पोलिसांनी वैभव काळे आणि सचिन झोड यांना त्यांच्या गावातून, तर समीर राऊतसह अन्य आरोपींना काटोल येथून अटक केली.
दोन आरोपी फरार...
या रॅकेटमधील आरोपी समीर पाचपोरे (रा. वडविहिरा) आणि गज्जू हे दोघे सध्या फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असून त्यांची माहिती घेतली जात आहे.
