कार्यालयातील टीव्ही आणि काचांची तोडफोड
गणेश पेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर आणि ग्रामीण कार्यालय आहे. भाजपासोबत युती न झाल्याने राष्ट्रवादीने नागपुरात स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतला. कालपासून इच्छुक उमेदवारांना 'ए-बी' फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. मात्र, अपेक्षित जागा किंवा तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या एका पदाधिकाऱ्याने कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडून आपला रोष व्यक्त केला.
advertisement
स्वबळाचा नारा अन् अंतर्गत बंडाळी
नागपुरात राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यापासून इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. पक्षाने कालपासून फॉर्म वाटप सुरू करताच, ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली. या नाराजीतूनच आज गणेश पेठ कार्यालयात तोडफोडीचा प्रकार घडला असून, पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच प्रकार पाहायला मिळाला. इथंही तिकीट नाकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात घुसून गोंधळ घातला आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवार आणि महिला पदाधिकारी दिव्या मराठे यांना तर थेट अश्रू अनावर झाले. मागील निवडणुकीत आपला एबी फॉर्म पळवला. आता थेट तिकीट नाकारलं. आमची चूक काय झाली? असा सवाल करत मराठे यांनी संताप व्यक्त केला.
