पण नागपुरात हा राजकीय संघर्ष थेट घरापर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे. पतीने बंडखोरी केल्याच्या कारणामुळे माजी महापौर पत्नीने थेट आपलं घर सोडलं आहे. त्या माहेरी येऊन राहत आहेत. जोपर्यंत पती माघार घेणार नाहीत, तोपर्यंत आपण माहेरी राहून पक्षाचा प्रचार करू, असा पवित्रा भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी घेतला आहे. राजकीय संघर्ष अशाप्रकारे घरापर्यंत आल्याने नागपुरात याची एकच चर्चा सुरू आहे.
advertisement
प्रभाग १७ मधील उमेदवारीवरून वादाची ठिणगी
नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १७ मध्ये भाजपकडून माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर इच्छुक होते. मात्र इथून पक्षाने काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले विनायक डेहनकर प्रचंड नाराज झाले. आपली दावेदारी डावलली गेल्याने त्यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले आणि अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पतीच्या या निर्णयामुळे डेहनकर कुटुंबात राजकीय मतभेदाची दरी निर्माण झाली.
अर्चना डेहनकर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असून त्यांनी २००९ ते २०१२ या काळात नागपूरचे महापौरपद भूषवलं आहे. "पक्षाने मला महापौरपदासारखा मोठा सन्मान दिला, त्यामुळे मी पक्षाशी गद्दारी करू शकत नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. पती विनायक डेहनकर यांनी बंडखोरी केल्याने त्या पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय अशा कात्रीत सापडल्या होत्या. अखेर त्यांनी वैयक्तिक नात्यापेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य देत, त्यांनी पतीचं घर सोडलं आहे.
भाजपचाच प्रचार करण्याचा निर्धार
अर्चना डेहनकर यांनी सध्या नागपुरातच असलेल्या आपल्या भावाच्या घरी आश्रय घेतला आहे. विशेष म्हणजे, घर सोडल्यानंतरही त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्या केवळ घरी बसणार नसून, भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा जोमाने प्रचार करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजकारणामुळे पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होण्याची ही नागपुरातील पहिलीच मोठी घटना मानली जात आहे. अर्चना डेहनकर यांच्या या भूमिकेचे भाजप वर्तुळात कौतुक होत असले, तरी या बंडखोरीमुळे पक्षाच्या मतांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.
