गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने केली. या आंदोलनात मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या काही ओळी जाळण्यात आल्याचे चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, संध्याकाळी दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली. शांत असणाऱ्या नागपुरात हिंसाचाराचा भडका उडाला. या भडक्यानंतर पोलिसांनी काही भागात संचार बंदी लागू केली. हिंसाचाराच्या दुसऱ्या दिवसापासून आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. या दंगलीचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
advertisement
>> मोमीनपुरा-हंसापुरीच टार्गेटवर का?
नागपूर मध्ये हिंसाचार घडविण्यासाठी शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी निवडक लोकांची झाली बैठक झाल्याची माहिती 'न्यूज 18 लोकमत'ला विश्वसनीय सूत्रांनी दिली. भालदारपुरा, यशोधरा नगर, गिट्टीखदान या भागातील तीन ठिकाणी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तिन्ही ठिकाणीच्या बैठकीत हिंसाचाराचे नियोजन करण्यात आले. याच बैठकीत पेट्रोल बॉम्ब, शस्त्र, दगड जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते, अशी माहिती समोर आली होती. कुठल्या भागात हिंसा भडकवायची याचे नियोजन देखील याच बैठकीत ठरले होते.
>> पोलिसांना अडकवण्याचा डाव
बैठकीत पोलिसांना चिटणीस पार्कमध्ये अडवून ठेवून हंसापुरी भागात हिंसाचार घडविण्याची रणनीती ठरविण्यात आली. हंसापुरी भागात राम नवमीला निघणाऱ्या शोभायात्रेत मुस्लिम समुदायाचे लोक सहभागी होतात, त्यामुळे त्याठिकाणी हिंसा घडवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने कट आखण्यात आला. राम नवमीला पोद्दरेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभयात्रेचे स्वागत मोमीनपुरा, हंसापुरी भागात मुस्लिम समाजातील लोक करत असतात. हंसापुरी भागात शोभायात्रेसाठी तयार होणाऱ्या चित्ररथाची आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली.
>> आरोपी दंगलग्रस्त भागाबाहेरील....
नागपूरच्या हिंसाचारामध्ये नावानिशी आरोपी करण्यात आलेल्या 51 लोकांमध्ये बहुतांशी लोक दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली त्या भालदारपुरा, चिटणीसपार्क, महाल, हंसापुरी या प्रभावित वस्त्यांच्या बाहेरचे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआर मध्ये ज्या 51 आरोपींची नावं आणि त्यांचे पत्ते देण्यात आले आहे. त्यामध्ये जवळपास 24 आरोपी हे दंगल सदृश स्थिती निर्माण झाली त्या प्रभावित क्षेत्राचे रहिवाशी नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
