गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने केली. या आंदोलनात मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या काही ओळी जाळण्यात आल्याचे चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, संध्याकाळी दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली. शांत असणाऱ्या नागपुरात हिंसाचाराचा भडका उडाला. या भडक्यानंतर पोलिसांनी काही भागात संचार बंदी लागू केली आहे. तर, दुसरीकडे नागपूर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे.
advertisement
पोलिसांच्या एफआयआरमध्ये काय?
नागपूर पोलिसांनी दाखल केलेल्या माहितीनुसार, फहीम शईम खान हा मायनॅारीटी डेमोक्रेटीक पार्टीचा नागपूर अध्यक्ष आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फईम खान याचाही समावेश आहे. फहीम खान याने नागपूरातून नितीन गडकरी यांच्या विरोधात 2024 ची लोकसभा निवडणूक लढवलेली होती. या निवडणुकीत त्याची अमानत रक्कमही जप्त झाली होती.
नागपूर पोलिसांनी दाखल केलेल्या FIR नुसार फहीम खान हा दंगलीचा मास्टरमाईंड असण्याची शक्यता आहे. फहीम खान शमीम खान मायनाँरिटीज डेमोक्रेटीक पार्टी (एम.डी.पी.)चे शहराध्यक्ष याने विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आंदोलनानंतर विहिप कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी घेऊन गणेश पेठ पोलीस ठाणे येथे 50 ते 60 लोकांना एकत्रित करून निवेदन दिले होते.
या निवेदनानंतर अप.क्र. 114/25 कलम 223 भा.न्याय संहिता सहकलम 37(1), 37(3) 135, महा.पो.का. प्रमाणे एकूण 09 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फहीम खान याने घटनेच्या दिवशी दुपारी 4 वाजता शिवाजी पुतळा परिसरात आलेल्या मशिदी जवळ 500 ते 600 लोकांना एकत्र केले. त्यावेळी त्याने हिंदू मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण होईल ह्या उद्देशाने लोकांना चिथावणी दिली.
पोलिसांनी फहीम खान याला समज देत निघून जाण्यास सांगितले. त्यावेळी नागरिकांना मारहाण व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियाद्वारे चिथावणी देणाऱ्या पोस्ट वायरल केल्या. त्याशिवाय, दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्याने घोषणा दिल्या गेल्या.
फहीमकडून पोलिसांविरोधात चिथावणी...
एफआयआरनुसार, फहीमने अभी पुलीस को दिखाते है । इनको छोडने का नही।' इन्होने ही सारा खेल किया है । इन्होनेही ये सब किया है।' अशा पद्धतीने घोषणा देत पोलिसांवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी जमावाने घातक शस्त्र कुऱ्हाड, दगड, लाठी काठी व इतर घातक शस्त्रांसह एकत्रित येत परिसरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने घातक शस्त्र हवेत फिरवून लोकांना त्याचा धाक दाखवून धर्माधर्मात शत्रुता वाढविण्याचे उद्देशाने समाजिक एकोपा बाधित होईल अशी कृती केली असल्याचे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. यावेळी जमावाने पोलिसांवर भालदारपूरा चौक परिसरात घातक शस्त्राने, दगडाने जीवानिशी ठार मारण्याचे उद्देशाने प्राणघातक हल्ला केला. पेट्रोल बॉम्ब तयार करुन पोलिसांवर फेकून फोडले.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडवून आई बहिणीचा उल्लेख करत शिवीगाळ करण्यात आली. तुम हिन्दू समाज के पोलीस हो तुमने जानबुझकर हमारे धर्म की चादर जलाने मे मदत की है ।'' अशा खोट्या अफवा पसरवण्यात आल्या. अश्लील शिवीगाळ करून पोलीसांना हाथबुक्कीने, दगडाने, घातक शस्त्राने मारहाण करून कर्तव्यावरील पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करत जखमी केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
