रंजना नागपूरकर असं आरोप करणाऱ्या महिलेचं नाव आहे. त्यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी कैलास फड, निखील फड यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. निलंबित केलेल्या पतीला सरकारी नोकरीत पुन्हा रुजू करतो, असं आश्वासन देऊन कैलास फड, निखील फड यांनी आपल्याकडून १७ लाख रुपये घेतले. हे पैसे धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यांच्याच बंगल्यावर हे पैसे दिले, असा आरोप नागपूरकर यांनी केला.
advertisement
रंजना नागपूरकर यांनी नेमका आरोप काय केला?
रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडे, कैलास फड आणि निखील फड यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. त्यांच्या पतीला सरकारी नोकरीत पुन्हा रुजू करून घेण्यासाठी मुंडे यांनी पैसे मागितले. त्यांनी २५ लाखांची मागणी केली होती. मात्र नंतर ही रक्कम कमी करून १७ लाख करण्यात आली. मी दोन तासांच्या अंतराने एकदा आठ तर एकदा नऊ लाख रुपये धनंजय मुंडेंच्या घरी नेऊन दिले. 'मी एकूण 17 लाख रुपये दिले. प्रथम परळीतील मुंडे यांच्या घरी गेल्या तेव्हा मुंडे यांनी सांगितलं, “जा, तुमचं काम आता पूर्ण झालं आहे.” पण नंतर ना पतीची नोकरी मिळाली, ना पैसे परत मिळाले', असा आरोप त्यांनी केला आहे.
बंदुकीचा धाक दाखवून धमकी
'मी पुन्हा पैसे मागायला परळीतील घरात गेले. तेव्हा तिथे धनंजय मुंडे, कैलास फड, निखील फड यांच्यासोबत मुंडे यांच्या पत्नी आणि आईही उपस्थित होत्या. त्यावेळी मुंडे यांच्यासमोरच माझ्या मानेवर पिस्तूल लावून भीती घातल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. “तू पुन्हा आलीस तर तुला गाडून टाकू, कुणालाही कळणारही नाही”, अशी धमकी मला देण्यात आली. या धमकीनंतर रंजना यांनी त्यांच्या बंगल्यावर जाणं बंद केल्याचा आरोप रंजना नागपूरकर यांनी केला. नागपूरकर यांच्या या आरोपानंतर आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
