नेमकं प्रकरण काय?
करण आणि रोहित असं गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावं आहेत. पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकते. गुरुवारी (२३ ऑक्टोबर) ही संतापजनक घटना घडली. घटनेच्या दिवशी आरोपींनी अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केले आणि तिला नागपूरजवळील एका लॉजवर घेऊन गेले. तिथे या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. एवढेच नाही, तर त्यांनी या विकृत कृत्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला.
advertisement
अत्याचाराचे अश्लील व्हिडीओ काढले
तसेच या प्रकाराबद्दल कुणालाही सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू, तुला जीवे मारू अशी धमकीही नराधमांनी पीडितेला दिली. त्यामुळे भीतीने दबलेल्या मुलीने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, शुक्रवारी सायंकाळी मुलीच्या आई-वडिलांना काहीतरी अयोग्य घडल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर तिने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.
दोन्ही नराधम अटकेत
धक्कादायक घटना कळताच मुलीच्या आई-वडिलांनी त्वरित नंदनवन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी करण आणि रोहित नावाच्या दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कार, अपहरण आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
