महाराष्ट्रात 58 वर्षांत प्रथमच...
नागपुरातील यंदाचं हिवाळी अधिवेशन एका गोष्टीमुळे खास असणार आहे. त्याचं कारण म्हणजे 58 वर्षांत प्रथमच दोन्ही विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी विरोधी पक्षाला सदस्यसंख्येच्या 10 टक्के जागा आवश्यक असते. त्यामुळे ही पदे रिक्त आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रस्ताव मिळाल्याचे विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
advertisement
कुणाचं नाव सुचवलं?
महाआघाडीने परिषदेसाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांचं नाव, तर विधानसभेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव सुचवलं गेलं आहे. त्यामुळे आता विधान परिषद अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विरोधीपक्ष नेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्यासंदर्भात जो निर्णय अध्यक्ष आणि सभापती घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्याबाबत आमचा कुठलाही आग्रह आणि दुराग्रह नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपला
दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये होणार आहे. पहिलं राज्य विधिमंडळ अधिवेशन असेल ज्यामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्याचं, एक संवैधानिक पद उपस्थितच नसेल. त्यामुळे अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेना नेते आणि माजी आमदार अंबादास दानवे हे परिषदेत विरोधी पक्षनेते होते आणि त्यांचा कार्यकाळ यावर्षी जुलैमध्ये संपला. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे.
