मृतक तरुणीचे नाव रुचिता भांगे (वय अंदाजे 22) असे असून आरोपी प्रियकराचे नाव सौरव जामगडे असे आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुचिता आणि सौरव हे काल सायंकाळच्या सुमारास नागपूर ग्रामीण हद्दीतील फेटरी परिसरातील एका OYO हॉटेलमध्ये गेले होते. दोघांमध्ये काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
advertisement
हॉटेलच्या खोलीत नेमकं काय घडलं?
घटनेच्या रात्री हॉटेलच्या खोलीत दोघांमध्ये तीव्र भांडण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच वादातून सौरवने रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास रुचिता हिच्यावर चाकूने हल्ला करत तिचा गळा कापून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपी सौरवने तात्काळ हॉटेलमधून पळ काढल्याचे समोर आले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात
आज सकाळी सुमारे 9.30 वाजता हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय आला. दरवाजा उघडल्यानंतर खोलीत रक्ताच्या थारोळ्यात रुचिता मृतावस्थेत आढळून आली, याची माहिती तात्काळ नागपूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिसांची विशेष पथके
दरम्यान, आरोपी सौरव जामगडे याच्या शोधासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, संभाव्य ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. आरोपीचा मोबाईल फोन, सीसीटीव्ही फुटेज तसेच हॉटेलमधील नोंदींच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रेमसंबंधातून घडलेल्या हत्येने समाज हादरला
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रेमसंबंधातून घडलेल्या या निर्घृण हत्येने समाज हादरून गेला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
