ही धक्कादायक घटना नागपुरातील पारडी परिसरातील एच.बी. टाऊन परिसरात घडली. नूर नवाज हुसेन असं हत्या झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर के बिसेन मुख्य आरोपीचं नाव आहे. मयत नूर आणि आरोपी हे दोघेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यात सीनियर-ज्युनिअरवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटांतील विद्यार्थी काल रात्री उशिरा एच.बी. टाऊन परिसरात एकत्र आले होते.
advertisement
मात्र, वाद मिटण्याऐवजी तो अधिक विकोपाला गेला. रागाच्या भरात मुख्य आरोपी के. बिसेन याने नूरवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात नूर गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
चार आरोपींना अटक, पुढील तपास सुरू
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून मुख्य आरोपी के. बिसेन याच्यासह आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून ही हत्या झाली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी काही कारण आहे का, या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
