सक्षम ताटे याचे आंचलशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आंचलच्या कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि हिमेश मामीडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशीचे तुकडे डोक्यात घालून त्याचा खून केला. गुरुवारी हे सगळे प्रकरण समोर आले. पोलिसांनी सक्षमविरोधात माझ्या भावाला भडकवले, असा आरोप आंचलने केला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत हत्येआधीचा घटनाक्रम आंचलने कथन केला.
advertisement
धर्म बदलण्यासाठी त्याला सांगितले गेले, तो तयारही झाला पण...
आमचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आमच्या घरच्यांना याबद्दल कुणकुण लागली होती. तो जयभीमवाला होता. त्यामुळे त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी आमच्या घरचे तयार नव्हते. तो दलित आहे, आपण हिंदू आहोत हे लग्न होऊ शकत नाही, असे मला घरचे लोक म्हणायचे. माझ्या कुटुंबाने त्याला सांगितले होते की जर त्याला माझ्याशी लग्न करायचे असेल तर त्याला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. तो हिंदू धर्म स्वीकारायला देखील तयार होता. पण तरीही माझ्या घरचे लोक ऐकायला तयार नव्हते. माझे कुटुंब त्याला मारण्यासाठी फक्त संधीची वाट पाहत होते.
असे काही घडेल याची कल्पना केली नव्हती...
सक्षम त्याच्या मावशीला सोडण्यासाठी सकाळी स्टेशनवर जात असताना आमच्या दोघांमध्ये बोलणे झाले होते. त्यानंतर आमच्यात बोलणेच झाले नाही. असे काही घडेल याची कल्पना मी केली नव्हती. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून मला हे कळले. सक्षमच्या हत्येबद्दल मला कोणीही काहीही सांगितले नाही.
माझे घरचे सक्षमवर नजर ठेवून होते....
ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली, त्या दिवशी माझा भाऊ सकाळी त्याच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी मला पोलिस ठाण्यात घेऊन गेला होता. मी कोणताही गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. पोलिसांनी माझ्या भावाला सांगितले की खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी, आणि आमच्याकडे येण्यापेक्षा त्या मुलाला तुम्ही मारून का टाकत नाही? माझ्या भावाने ते पोलिसांचे म्हणणे मनावर घेतले. त्याला मारूनच तुमच्याकडे येतो, तोवर तोंड दाखवणार नाही, असे म्हणून तो पोलीस स्टेशनमधून निघाला. त्याने सक्षमवर नजर ठेवून त्याची हत्या केली..." असे आंचलने सांगितले.
