नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 70 ते 80 किमी परिसरातील रुग्ण इथं दाखल होतात. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झालाय. यात 12 नवजात बाळांचा आणि 12 इतर रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी माहिती देताना सांगितलं की, मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये साप चावल्याने, विषबाधा झालेल्यांचाही समावेश आहे. रुग्णांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी रुग्णसेवेत फारशी अडचण झालेली नाही.
advertisement
दरम्यान, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे यांनी मृत्यूमागचे कारण सांगताना शासकीय रुग्णालयात औषधांच्या प्रचंड तुटवड्याकडे लक्ष वेधले. त्यांनी म्हटलं की, राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. हाफकिनकडून औषधांची खरेदी बंद केली आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नसल्याचंही ते म्हणाले.
काही काळात हाफकिन या संस्थेकडून औषधांची खरेदी होणार होती, ती झालेली नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडतेय. अशावेळी अत्यवस्थ रुग्ण आणि लहान मुलांचा औषधाअभावी मृत्यू होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.