हिमगौरी आहेर-आडके कोण आहेत?
हिमगौरी आहेर-आडके या भाजपचे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांच्या चुलत बहिण आहेत. आहेर कुटुंबाचा भारतीय जनता पक्षाशी असलेला संबंध अनेक दशकांचा आहे. राहुल आहेर यांचे वडील दिवंगत डॉ. डी. एस. आहेर हे भाजपचे कट्टर आणि निष्ठावान नेते म्हणून ओळखले जात होते. नाशिक विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदार तसेच खासदार अशी दोन्ही महत्त्वाची पदे भूषवली होती. याशिवाय राज्याचे आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.
advertisement
भाजपच्या सुरुवातीच्या टप्प्यात, जेव्हा पक्षाचा राज्यात फारसा प्रभाव नव्हता, त्या काळापासून आहेर कुटुंब पक्षासोबत ठामपणे उभे राहिले. डॉ. डी. एस. आहेर यांचा तोच राजकीय वारसा त्यांचे पुत्र राहुल आहेर पुढे नेत असून, चांदवड मतदारसंघातून त्यांनी सलग तिसऱ्यांदा आमदारकी मिळवत हॅट्रिक साधली आहे. हिमगौरी आहेर-आडके यांच्या महापौरपदाच्या निवडीत राहुल आहेर यांचे राजकीय वजन उपयोगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
निष्ठावंतांना संधी देण्याचा भाजपचा निर्णय
नाशिक महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने निवडणुकीपूर्वी विविध पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिला होता. त्यांना थेट उमेदवारी देण्यात आल्याने पक्षावर ‘आयाराम-गयाराम’ राजकारणाचा आरोपही झाला. मात्र महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव जाहीर करून भाजपने अखेर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय दिल्याचे स्पष्ट केले आहे.
आहेर कुटुंबाचा प्रभाव, पक्षाशी असलेली दीर्घकालीन बांधिलकी आणि हिमगौरी आडके यांचे शिक्षण व कार्यक्षमता पाहता महापौरपदाच्या शर्यतीतील इतर संभाव्य नावे आपोआप मागे पडल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे त्यांच्या मातोश्री शोभा आहेर या यापूर्वी उपमहापौर राहिल्या आहेत, तर वडील बाळासाहेब आहेर यांनी भाजपच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव त्यांना घरातूनच लाभलेला आहे.
भाजपचे राजकीय समतोलाचे गणित
डॉ. राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक साधल्यानंतर प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रीपदाचा शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र तो शब्द अद्याप पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत शहराच्या राजकारणात आहेर कुटुंबाला महत्त्व देत भाजपने हिमगौरी आडके यांना महापौरपदाची संधी दिल्याचे मानले जात आहे. याचवेळी उपमहापौरपदावर बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांना संधी देत भाजपने पंचवटी परिसरातील राजकीय समतोलही साधला आहे.
महापौरपदाच्या शर्यतीतील इतर नावे
महापौरपदाच्या स्पर्धेत दीपाली गिते यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र त्या पहिल्यांदाच निवडून आल्याने त्यांच्याकडे प्रशासनाचा अनुभव कमी होता. शिवाय त्यांच्या पती गणेश गिते यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर दीपाली कुलकर्णी आणि संध्या कुलकर्णी यांचीही नावे चर्चेत होती. मात्र याआधी भाजपच्या सत्ताकाळात सतीश कुलकर्णी यांना महापौरपदाची संधी मिळालेली असल्याने यावेळी नव्या चेहऱ्याला प्राधान्य देण्यात आले.
