कष्टकरी कुटुंबातून सुरू झाला संघर्ष
आनंदवली परिसरात राहणाऱ्या कविता लोखंडे यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय होते. वीस वर्षांपूर्वी त्यांचे लग्न दशरथ लोखंडे यांच्याशी झाले. दशरथ लोखंडे हे एका बांधकाम कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करत होते. मर्यादित उत्पन्नामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड जात होते. अशा परिस्थितीत कविता यांनी घरखर्चाला हातभार लावण्यासाठी विविध कामे केली.
advertisement
भाजी विक्रीपासून ते मेस टिफिन सेवापर्यंतचा प्रवास
कविता लोखंडे यांनी सुरुवातीला भाजीपाला विक्री, वडा पाव स्टॉल चालवणे, शिवणकाम अशी कामे केली. मात्र वाढता खर्च आणि मुलांचे शिक्षण पाहता हे उत्पन्न अपुरे पडू लागले. अखेर त्यांनी मेस टिफिन सेवा सुरू केली. घरगुती, चविष्ट आणि स्वच्छ जेवणामुळे त्यांच्या टिफिन सेवेची परिसरात चांगलीच ओळख निर्माण झाली. याच व्यवसायामुळे कुटुंबाचे आर्थिक गणित हळूहळू सावरू लागले.
समाजसेवेची ओढ आणि राजकारणात प्रवेश
दरम्यान, दशरथ लोखंडे यांना समाजसेवेची आवड होती. त्यांनी राम लखन क्रीडा संघटनेच्या माध्यमातून युवक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रम सुरू केले. या कामातून परिसरात त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.
तिकीट नाकारले, पण हार मानली नाही
२०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत कविता लोखंडे यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना प्राधान्य दिल्यामुळे त्यावेळी तिकीट मिळाले नाही. हा धक्का मोठा असला तरी लोखंडे कुटुंबाने समाजसेवा सुरूच ठेवली. पुढे शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांच्या कामाची दखल घेत भारतीय जनता पक्षाने कविता लोखंडे यांना उमेदवारी दिली.
लोकांच्या विश्वासावर मिळवले यश
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. अनेक संपन्न उमेदवारांमध्ये, कोणताही राजकीय वारसा नसलेल्या कविता लोखंडे यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून विजय मिळवला. परिसरातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाला, असे कविता लोखंडे सांगतात.
प्रभागाच्या विकासाचा निर्धार
नवनिर्वाचित नगरसेविका कविता लोखंडे म्हणाल्या, “माझ्या यशाचे श्रेय मी भाजप, माझे पती दशरथ लोखंडे आणि माझ्या प्रभागातील मतदारांना देते.” प्रभागात पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेच्या समस्या गंभीर असून त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांचे सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे.
सामान्य महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण
भाजी विक्रेत्यापासून नगरसेविकेपर्यंतचा कविता लोखंडेंचा प्रवास अनेक सामान्य, कष्टकरी महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पैसा किंवा राजकीय ओळखी नसतानाही प्रामाणिक काम, चिकाटी आणि लोकांचा विश्वास असेल तर राजकारणात यश मिळू शकते, हा संदेश त्यांच्या विजयाने दिला आहे.
