न्याहारीची ती वेळ ठरली जीवघेणी
गोरख लक्ष्मण जाधव हे नेहमीप्रमाणे शिवडे परिसरातील शेतात कामाला गेले होते. सकाळी १० वाजता कामातून थोडा विसावा घेऊन ते न्याहारी करत बसले होते. दोन घास खात असतानाच, पाठीमागून दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. काही समजण्याच्या आतच गोरख जाधव बिबट्याच्या जबड्यात अडकले होते. रक्ताचा तहानलेला तो बिबट्या आपली पकड घट्ट करत होता आणि गोरख जगण्यासाठी झुंज देत होते.
advertisement
४० फूट खोल विहिरीत मृत्यूशी झुंज
दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. जवळच एक विहीर होती, दुर्दैवाने त्या विहिरीला संरक्षण कठडा नव्हता. झटापटीच्या ओघात गोरख आणि त्यांना जबड्यात पकडलेला तो बिबट्या दोघेही ४० फूट खोल विहिरीत कोसळले. विहिरीत पाणी असल्याने दोघेही बुडू लागले. शेतातील महिलांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. ग्रामस्थ धावत विहिरीपाशी आले, पण तिथे जे दृश्य होतं ते पाहून काळजाचा ठोका चुकला.
प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
विहिरीतील विद्युत पंपाच्या फाउंडेशनचा आधार घेऊन बिबट्या बसला होता आणि त्याच्या जबड्यात अजूनही गोरख यांची मान अडकलेली होती. "मी धावत आलो तेव्हा बिबट्याने जाधव यांची मान सोडलेली नव्हती, तो त्यांना पंज्याने ओरबाडत होता," असे शेतमालक गणपत चव्हाणके यांनी अश्रूभरल्या डोळ्यांनी सांगितलं. काही वेळाने बिबट्याची पकड सैल झाली आणि जखमी गोरख विहिरीच्या खोल पाण्यात बुडाले. विहिरीत बिबट्या असल्यामुळे कोणाचीही आत उतरून गोरख यांना वाचवण्याची हिंमत झाली नाही.
पिंजरा पोहोचला पण बिबट्या वाचला नाही कारण...
अखेर दुपारी १ वाजता वनविभागाचे पथक पिंजरा घेऊन पोहोचले. पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला जेरबंद करण्यात आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. गोरख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र पिंजराही वारंवार पाण्यात बुडत असल्याने बिबट्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला होता. पिंजऱ्यातून जेव्हा बिबट्याला बाहेर काढलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात ही धक्कादायक घटना घडली.
