दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील आयएएस (IAS) अधिकाऱ्यापाठोपाठ दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या, ज्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या या महिला अधिकाऱ्यांपैकी एक डीसीपी (DCP) तर दुसरी एसीपी (ACP) दर्जाची अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन महिला पोलीस अधिकारी कोण? असा सवाल देखील विचारला जातोय.
advertisement
आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून बाबाकडे धाव?
वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकाऱ्यांचे नाव खरातसोबत जोडले गेल्याने तपास यंत्रणांनी नव्या मार्गाने तपास सुरू केला आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का? असा सवाल देखील विचारला जात आहे. अशोक खरात प्रकरणात भोंदू बाबासोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का? याबाबत तपास होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागात देखील खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.
बनावट बँक खाती उघडल्याचा संशय
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अशोक खरातच्या नाशिकमधील तृप्तबाला बंगल्याची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना असंख्य आधार कार्ड आणि पॅनकार्ड मिळाले आहेत. या कागदपत्रांचा वापर करून अशोक खरातने बनावट बँक खाती उघडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्राथमिक तपासात तब्बल 131 बनावट बँक खाती उघडल्याचे समोर आल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातची एसआयटी चौकशी सुरु आहे.
