नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत विश्वकर्मा नावाच्या युवकावर लोंढे टोळीच्या सदस्यांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी प्रथम चंद्रकांत विश्वकर्मा यांच्या डोक्यात कोयत्याने गंभीर वार केले, ज्यामुळे तो जबर जखमी झाला. एवढ्यावरच न थांबता, टोळीतील गुंडांनी क्रूरतेची परिसीमा गाठत, त्या युवकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यात चंद्रकांत विश्वकर्मा गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
म्होरक्या अटकेत असूनही गुंडगिरी कायम
या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, लोंढे टोळीचा म्होरक्या माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. टोळीचे प्रमुख अटकेत असतानाही, त्यांच्या टोळीतील सदस्य खुलेआमपणे दहशत माजवत असून, पोलिसांना थेट आव्हान देत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकाश लोंढेंच्या टोळीने एका बारमध्ये गोळीबार केला होता. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला होता. संबंधित तरुणाच्या मांडीत गोळी लागली होती. खंडणी उकळण्याच्या उद्देशाने लोंढे टोळीने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सातपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रकाश लोंढे याच्यासह त्याचा मुलगा दीपक लोंढेला अटक केली होती. आता लोंढे पिता पुत्र अटकेत असताना देखील लोंढे टोळीची दहशत दिसून आली आहे.