या घटनेत शिव संपत बोस (6) हा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. लंकाबाई पंढरीनाथ बोस (75) या आजीने सर्वस्व पणाला लावून बिबट्याचा हल्ला परतवून लावल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. खडंगळठी-पंचाळे शिव रस्त्यावर निमगाव-देवपूर शिवारात संपत बोस यांची वस्ती आहे. तेथून काही अंतरावर त्यांचा एक भाऊ वास्तव्यास आहे. या भावाकडे शिव खेळण्यासाठी गेला होता.
advertisement
बिबट्याचा प्रतिकार करत तावडीतून केली मुलाची सुटका
सकाळी 11.30 च्या सुमारास आजी लंकाबाई त्याला परत घेऊन येत होत्या. त्यावेळी सोयाबीनच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर झडप घातली. यावेळी आजीने प्रसंगावधान राखून सर्व शक्तिनिशी बिबट्याचा प्रतिकार करत तावडीतून मुलाची सुटका केली. सुटका केल्यानंतर आजीने आरडा ओरडा करताच मदतीसाठी धावा केला, स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बिबट्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सोयाबीनच्या शेतात धूम ठोकली. मुलाच्या पाठीला बिबट्याची नखे लागल्यामुळे तो जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. हिंसक बिबट्याला कडवी झुंज देऊन परतवून लावले आहे. नातवाला वाचविण्यासाठी आजीने बिबट्याशी झुंज दिल्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे .
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला आहे. तिथून दीड किलोमीटर असलेल्या अंतरावर असलेल्या धनगरवाडी शिवारातही बिबट्याला पकडण्यासाठी दुसरा पिंजरा लावण्यात आला आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस कृती कार्यक्रम राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, संतप्त गावकऱ्यांनी तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग आता यावर काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.