नाशिक - नवरात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला आहे. नवरात्रीच्या कालावधीमध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदाही मोठ्या प्रमाणात याठिकाणी भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे यंदा गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातून सुमारे 300 जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
कसे असे नियोजन -
घटस्थापना ते दसरा आणि दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत या गाड्या धावतील. त्यामुळे भाविकांना खासगी वाहने गडाच्या पायथ्याशी लावून एसटीनेच गडावर जावे लागेल. नाशिक, मालेगाव, मनमाड, सटाणा, इगतपुरी आणि नांदुरी या ठिकाणाहून सप्तशृंगी गडासाठी या बसेस धावतील.
याठिकाणी उभारण्यात आली वाहतूक केंद्रे -
प्रवासी वाहतूक सेवा सुधारित भाडे आकारणीसह 24 तास असणार आहे. यासाठी ठक्कर बाजार, नांदुरी पायथा वाहनतळ, सप्तशृंगी गड वाहनतळ या ठिकाणी वाहतूक केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासोबतच नाशिक ते सप्तशृंगीगड या मार्गावर ई-बसच्या 30 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
पहाटे 5 ते रात्री साडेसात या कालावधीत या बसेस वणी गडासाठी धावणार आहेत. कुठल्याही भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात याठिकाणी भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच आता महामंडळाच्या 300 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.