Crime in Nashik: नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपलं खरं नाव आणि धर्म लपवून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिचं धर्मांतर करून तिला पर पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडलं आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने तरुणीसोबत अशाप्रकारे अत्याचार होत होता.
advertisement
अखेर तरुणीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने तिच्यासोबत घडलेली आपबिती पोलिसांना सांगितलं यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सोहेल आवेश अन्सारी ऊर्फ विशाल जाधव (वय २५, रा. भारतनगर) असं संशयित आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मे ते सप्टेंबर २०२५ या काळात नाशिकरोडला वास्तव्यास होती. याच दरम्यान शेजारी राहणाऱ्या आरोपी सोहेल अन्सारीसोबत तिची ओळख झाली. त्याने आपले खरे नाव आणि धर्म लपवला होता. आपण ‘विशाल जाधव’ असल्याची खोटी माहिती आरोपीनं तिला सांगितली. या खोट्या नावाने त्याने तरुणीसोबत ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर त्याने लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.
धर्मांतर करून केला निकाह, नंतर...
काही दिवसांनंतर आरोपीने पीडितेला वडाळागाव भागात नेले. तिथे त्याने तिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले आणि तिचा धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले. यानंतर त्याने तिच्यासोबत निकाह केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. लग्नानंतर कोणताही कामधंदा नसल्याने पैशांची चणचण भासू लागल्यामुळे त्याने अमानुष कृत्य करण्यास सुरुवात केली. आरोपीने पीडितेला चक्क वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. "मला कामधंदे नाहीत, तू परपुरुषासोबत संबंध ठेव," असं म्हणत त्याने अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. यातून मिळणाऱ्या पैशांतून तो स्वतः मौजमजा करत असल्याचं पीडितेनं फिर्यादीत नमूद केलं आहे.
