सातपूर गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी आता महायुतीच्या बड्या नेत्याला अटक केली आहे. प्रकाश लोंढे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया अर्थात आरपीआय आठवले गटाचा नेता आहे. तीन दिवस सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी लोंढेला बेड्या ठोकल्या आहेत.
बारमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून बार मालकाकडून पैसे उकळण्याचा त्याचा कट असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पोलिसांनी प्रकाश लोंढे याच्यासह त्याचा मुलगा दीपक लोंढेलाही अटक केली आहे. तसेच तर लोंढेचा दुसरा मुलगा भूषण लोंढे हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. प्रत्यक्ष गोळीबारात भूषणचा सहभाग होता, अशी महितीही आता समोर येत आहे.
advertisement
या घटनेची अधिक माहिती देताना सातपूर पोलिसांनी सांगितलं की, "सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली गोळीबाराची घटना पूर्वनियोजित पद्धतीने कट रचून केल्याचं निष्पन्न झालं आहे. या गुन्ह्यातील टोळीचा प्रमुख प्रकाश लोंढे, मुलगा दीपक नाना प्रकाश लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे अशा चार आरोंपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे. इतर दोन आरोपींना देखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात येत आहे. सोबतच या टोळीने केलेल्या गुन्हेगारी कृत्यांविषयी सातपूर पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. अंबड पोलीस ठाण्यात देखील आणखी एक गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. एकूणच प्रकाश लोंढे आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीविषयी कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे."