महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली: माओवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्यासाठी धक्कादायक कृत्य केलं. एका शिक्षकाचं अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या केली. नेन्द्र गावातील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कल्लू ताती यांचं गुरुवारी संध्याकाळी शाळेतून घरी परत जात असताना अपहरण केलं. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शुक्रवारी मध्यरात्री त्यांची माओवाद्यांनी हत्या केल्याचे समोर आले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
ही धक्कादायक घटना छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून माओवादी दहशतीमुळे या भागातील अनेक शाळा बंद होत्या. मात्र, आता हळूहळू या शाळा पुन्हा सुरू होत असल्याने स्थानिक विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. माओवाद्यांनी शिक्षकांनाच आपले लक्ष्य केल्यामुळे आता हे आशादायक चित्र पुन्हा एकदा धुसर झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, माओवाद्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल नऊ शिक्षकांची हत्या केली आहे. माओवाद्यांना शिक्षण आणि विकासाच्या कामात अडथळे निर्माण करायचे असल्यामुळे ते या कामात सहभागी असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
बीडमध्ये भीषण अपघात, देवदर्शनासाठी जाणाऱ्या 6 जणांना भरधाव कंटेनरने उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू
कल्लू ताती यांच्या हत्येमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शिक्षकांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढली आहे. परिसरातील शाळा पुन्हा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
मात्र, या घटनांमुळे माओवादग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था आणि शिक्षकांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासन आणि सरकार यावर काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशा घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण आहे.
