मुंबई, 26 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले आहेत. बारामतीकरांकडून अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. जेसीबीवरून फुलांची उधळण करत अजित पवारांचं बारामतीमध्ये स्वागत करण्यात आलं. यानंतर अजित पवारांचा शारदा प्रांगणात नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभानंतर अजित पवारांनी भाषण केलं, तसंच आपण सत्तेमध्ये सहभागी का झालो याचं कारणही सांगितलं.
advertisement
2004 ला मुख्यमंत्रीपद मिळाल नाही, उध्दव ठाकरेंसोबत पण अडीच-अडीच वर्ष करता आला असतं, पण मला काही गोष्टी बोलता येत नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
अजित पवारांचं भाषण
'मी बारामतीकरांच्यासमोर काय बोलायचं असा प्रश्न पडला, मला 91 पासून तुम्ही निवडून दिलं आहे, मी जो काही आहे तो बारामतीकरांमुळेच आहे. एवढं प्रेम केलंय की कधीच ऋण फेडू शकत नाही. पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालोय. मी यायचं ठरवलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली, अधिवेशन झालं. नक्की कोणत्या कारणांमुळे अजित पवारांनी ही भूमिका घेतली हे कळलं पाहिजे,' असं अजित पवार म्हणाले.
'मी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललो आहे, तेव्हा तो कृतीतून दिसला पाहिजे, असं वागतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाला असुरक्षित वाटणार नाही, जोपर्यंत मी मंत्रिमंडळात आहे, हा शब्द देतो,' असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.
'यंदाचा उन्हाळा कसा जाईल याची चिंता आहे. मी सत्तेला हापापलेला नाही, मी काही ताम्रपट घेऊन आलेलो नाही, हे मला माहिती आहे. मीच मोदींच्या विरोधात सभा घेतल्या, पण मला माहिती नव्हतं पुढे काम कसं होणार आहे. मी सरकारमध्ये जायचा निर्णय घेतला तो फक्त विकासासाठी. माझा कुणाचाही अपमान करायचा इरादा नाही. आता मोदींचं नेतृत्व खंबीर आहे. जेव्हा नेहरुंचं नेतृत्व होतं, ते खंबीर होतं,' असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. या सभेमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीतल्या फुटीबाबत कोणतंही वक्तव्य केलं नाही, तसंच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नावही त्यांनी भाषणामध्ये घेतलं नाही.
