पुण्यात युतीमध्ये जागा वाटपावरून प्रचंड धुसफुस आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला १५ जागाच द्यायला तयार असल्याने नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर इच्छुकांनी आंदोलन करून तुम्ही कोणत्या आधारावर १५ तिकीटांवर समाधान मानले? असे विचारले. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी शिवसैनिकांची समजूत काढून जागा वाटपासंबंधी सुरू असलेल्या चर्चेचा तपशील त्यांना सांगितला.
...तर स्वतंत्रपणेही लढू, शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर नीलम गोऱ्हेंचे वक्तव्य
advertisement
आमच्या शिवसेना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना चुकीची माहिती मिळाली होती. आपण केवळ १५ तिकीटे मागितली, असे त्यांना सांगण्यात आले. वास्तविक आम्ही २५ पेक्षा अधिक जागांची मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली आहे. मात्र अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर दुसऱ्या पर्यायांची चाचपणी आपण करू शकतो, असे पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश स्वतंत्रपणे लढा असा आला तर तो देखील निर्णय घेऊ, असेही सांगितल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
कमर्शिअल तिकीट वाटपाचा मुद्दा नीलम गोऱ्हे यांनी खोडून काढला
तिकीट वाटपाचा निर्णय कुणी एक व्यक्ती घेत नसतो. संपूर्ण पुणे शहरातील कोअर कमिटीतील नेते तिकीट वाटपाचा निर्णय घेत असतात. कोअर कमिटीतील नेत्यांच्या शिफारशीनुसार उमेदवारीचे सूत्र अंतिम होते, असे सांगत कमर्शिअल तिकीट वाटपाचा मुद्दा नीलम गोऱ्हे यांनी खोडून काढला.
चर्चा सकारात्मक झाली, शिवसैनिकांची समजूत काढली
आज आलेले पदाधिकारी नेहमीच माझ्या घरी येतात. आज पहिल्यांदाच ते घरी आले, असे काही नाही. आमची सकारात्मक चर्चा झाली. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची समजूत काढण्याचा मी प्रयत्न केला, असे गोऱ्हे यांनी सांगितले.
पुणे शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत
दुसरीकडे शिवसेना नेते रविंद्र धंगेकर, आबा बागूल , अजय भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. शिवसेनेकडून २५ जागांची मागणी करण्यात आलेली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून आपण मार्ग काढून कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, असे एकनाथ शिंदे यांना सांगणार असल्याचे नेत्यांनी सांगितले.
