मराठा आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा इशारा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. सरकारने संविधानाच्या चौकटीतच निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
माध्यमांशी बोलताना तायवाडे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील काय मागणी करतात, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, सरकारने संविधान आणि न्यायालयाच्या चौकटीत जे बसेल तेच आरक्षण द्यावे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत. 'जर आमच्यावर वेळ आलीच, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ,' असा इशाराही त्यांनी दिला.
advertisement
ते पुढे म्हणाले की, "धमकीचे शब्द वापरणे महाराष्ट्रासाठी नवीन नाही. सरकार अशा धमक्यांना किती महत्त्व देते, हे बघावे लागेल. जर प्रत्येक आंदोलनकर्त्याच्या धमकीला सरकार घाबरले असते, तर सरकारने कामच केले नसते." आंदोलनाच्या वेगवेगळ्या भाषा आणि तंत्र असतात, मात्र सरकारने जे योग्य आहे तेच द्यावे आणि अयोग्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही आंदोलनकर्त्याने कितीही आक्रमकता दाखवली, तरी सरकारला संवैधानिक आणि न्यायालयीन चौकटीत राहूनच काम करावे लागेल, असे तायवाडे यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे.