नांदेड, 28 सप्टेंबर : राज्यभरात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना नांदेडमध्ये मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बामणी इथं खड्यातील पाण्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. हे तिन्ही मुले 12 ते 15 वर्ष वयोगटातील होती. यामध्ये दोघे हे सख्खे भाऊ होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बामनी येथील शैचालयास गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा माळाच्या पायथ्याशी असलेल्या खड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली. धक्कादायक म्हणजे, मृत्यू पावलेल्यांमध्ये 2 सख्या भावांचा समावेश आहे.
वैभव पंढरी दुधारे (वय 15) बालाजी पिराजी गायकवाड (वय 9), देवानंद पिराजी गायकवाड (वय 12 ) आणि आणखी एक असे चार शाळकरी मुलं आज दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास शौचालय जातो म्हणून गावापासून थोड्या अंतरावरील माळराणाच्या पायथ्याशी पाण्याने भरलेल्या खड्ड्या जवळ पोहचले. गावाजवळच्या खड्यात पाणी भरलेले आहे. इथं अनेक जण पोहण्यासाठी येत असतात.
तिथे पोहचल्यानंतर वैभव, बालाजी आणि देवानंद हे तिघे पाण्यात उतरले. माळरानाच्या पायथ्याशी असलेल्या खड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवाटून टाकणारा होता. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी दोन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.