अमोल विजय कुलट (वय १९, रा. दाभरुळ, ता. पैठण) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी अमोल आणि पीडितेचा पती हे लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते. यामुळे अमोलचं पीडितेच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. कुटुंबातील सदस्य म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला जात होता, मात्र याच विश्वासाचा त्याने गैरफायदा घेतला.
धमकी देऊन पाशवी कृत्य
advertisement
जानेवारी २०२५ मध्ये आरोपीने पहिल्यांदा पीडितेच्या असहायतेचा फायदा घेतला. तिची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने पहिल्यांदा तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर पीडितेच्या मनात भीती निर्माण करून त्याने हे पाशवी कृत्य वारंवार सुरूच ठेवले. १८ जानेवारीच्या रात्री पीडितेचा पती काही कामानिमित्त घराबाहेर असताना, अमोलने पुन्हा संधी साधली. त्याने घरात घुसून पीडितेला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला. "कोणाला काही सांगितल्यास तुला आणि तुझ्या पतीला जीवे मारीन," अशी धमकी त्याने दिली. २० जानेवारी रोजी त्याने पुन्हा घराकडे येत जातीवाचक शिवीगाळ करत पतीला संपवण्याची धमकी दिली.
आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी
अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमोल कुलटला तातडीने बेड्या ठोकल्या. आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. गडवे यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जीवलग मित्रानेच अशाप्रकारे विश्वासघात केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत.
