मुंबईत पंकज पाटील यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सोबत प्राथमिक चर्चा झाली असून येत्या गुरुवारी हा पक्ष प्रवेश होणार आहे. तर माजी जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम सभापती पुंडलिक तथा बंधू पाटील यांनीही तटकरे यांच्याशी चर्चा केली असून ते देखील गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
बंधू पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार
advertisement
रायगड जिल्हा परिषदेत सुनील तटकरे हे अध्यक्ष असताना बंधू पाटील हे जिल्हा परिषदेत अर्थ आणि बांधकाम सभापती होते. त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून अलिप्त झाले होते. आता पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीत समावेश केला जाणार असल्याचे समजते.
सुधाकर घारे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांना दणका
दोन्ही प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना जोरदार हादरा दिला असून त्यामुळे कर्जत नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कर्जत खालापूर मध्ये ताकद वाढल्याचे बोलले जाते.
दोन्ही प्रवेशाची माहिती खुद्द तटकरे यांनीच दिली
आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बांधकाम, अर्थ व नियोजन सभापती पुंडलिक (बंधू) पाटील आणि शिवसेना कर्जत विधानसभा संघटक श्री. पंकज पुंडलिक पाटील यांनी माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान त्यांनी येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या प्रवेशाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या आगमनाने पक्षसंघटन अधिक बळकट होईल, असा मला विश्वास आहे. या प्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर घारे तसेच, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
