ही घटना 24 डिसेंबर 2024 रोजी घडली होती. सायंकाळच्या गर्दीत काही प्रवाशांना एक तीन वर्षांची मुलगी प्लॅटफॉर्मवर एकटीच बसून रडताना दिसली. सुरुवातीला अनेकांना वाटलं की तिचे आई-वडील थोड्यावेळासाठी बाजूला गेले असावेत. मात्र काही मिनिटांचे तास झाले, तरी कोणीच परत आलं नाही. अखेर प्रवाशांनी स्टेशन कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि प्रकरण GRP कडे पोहोचलं.
advertisement
CCTV फुटेजने उघड केली धक्कादायक बाब
पोलीसांनी मुलीला ताब्यात घेत स्थानकातच काही वेळ थांबून पालक परत येण्याची वाट पाहिली. मात्र कोणीही पुढे आलं नाही. त्यानंतर तपासासाठी स्टेशनवरील CCTV फुटेज तपासण्यात आलं.
या फुटेजमधून समोर आलेली बाब धक्कादायक होती. दृश्यांमध्ये मुलीचे स्वतःचे आई-वडील तिला स्थानकावर घेऊन येताना, काही वेळ तिच्यासोबत उभे राहिल्यानंतर तिला तिथेच सोडून निघून जाताना दिसत होते.
तपासात हेही स्पष्ट झालं की ही मुलगी शारीरिकदृष्ट्या अपंग आहे, ज्यामुळे गुन्ह्याची गंभीरता आणखी वाढली. त्या वेळी आम्ही सर्व शक्य प्रयत्न केले, मात्र पालकांचा काहीच माग काढता आला नाही, असं एका वरिष्ठ GRP अधिकाऱ्यांनी सांगितलं. अखेर ही मुलगी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचं स्पष्ट झाल्यानंतर 2 फेब्रुवारी 2025 रोजी FIR दाखल करण्यात आला.
महाराष्ट्रभर शोध, तरीही पालकांचा पत्ता नाही
तपास अधिक व्यापक करण्यात आला. पनवेलहून सुटणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे CCTV फुटेज तपासण्यात आले. संशयित जोडप्याचे स्थिर फोटो महाराष्ट्रातील विविध पोलीस यंत्रणांना पाठवण्यात आले.
आमचा अंदाज आहे की ते राज्यातच कुठेतरी पळून गेले असावेत. प्रवासी यादी तपासल्या, फुटेज पाहिली, पण ठोस धागा मिळाला नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुलगी केवळ आपलं नाव सांगू शकते. पालक किंवा नातेवाईकांविषयी तिला कोणतीही माहिती आठवत नाही.
दोन वर्षांनंतर तपास पुन्हा सुरू
आता दोन वर्षांनंतर नवीन तंत्रज्ञान आणि डेटा शेअरिंगच्या मदतीने पनवेल GRP ने तपास पुन्हा सुरू केला आहे. आम्ही अजूनही आशावादी आहोत. कुठेतरी काहीतरी धागा मिळेल, असं एका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
मुलगी सुरक्षित, पण कायदेशीर कारवाई अटळ
दरम्यान, या मुलीला बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली शासकीय मान्यताप्राप्त आश्रयगृहात ठेवण्यात आलं आहे. वैद्यकीय तपासणीत तिची प्रकृती स्थिर असल्याचं निष्पन्न झालं असून तिला सातत्याने उपचार आणि काळजी मिळत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की अल्पवयीन मुलाला, विशेषतः अपंग मुलाला सोडून देणं हा गंभीर गुन्हा आहे. पालक सापडताच त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
