काँग्रेस नेते नितीन राऊत पोडीयमवर बोलत होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की परभणी प्रकरणावर अल्पकालीन प्रक्रियेला सुरुवात झाली. पण आम्हाला अपेक्षा होती ती न्यायाची भूमिका घेतील. पण तसे नाहीच घडले. याउलट संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्याला लपवण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप नितीन राऊत यांनी केला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्याला लपवण्याचा प्रयत्न होतोय. कोंबिंग ऑपरेशन संदर्भात माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पोलीस जबरदस्तीने कोंबिंग ऑपरेशन करत आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाच पोलीस महिलेला घेऊन जात असताना मारताना दिसत आहे. त्यामुळे सभागृहात मला परवानगी दिली असती तर मी व्हिडिओ दाखवले असते, असे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर अत्यंत चुकीची माहिती आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
परभणीवर फडणवीस विधानसभेत काय बोलले?
काही संघटनांनी परभणी बंदची हाक दिली. पोलिसांनी बंद शांततेत बंद व्हावा यासाठी शांतता बैठक बोलावली. त्यावेळी 70 च्या आसपास संघटना होत्या. त्या चर्चेत 19 ठिकाणी आंदोलन करण्यात आले. सगळं शांततेत सुरू होते. काही संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
काहींच्या जमावाने अचानक टायर जाळण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांनी देखील बंद पाळला होता. मात्र, त्यांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली, सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, गाड्या जाळण्यात आल्या. पोलिसांनी जमाव बंदी लागू केली,काही महिला होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला त्यांनी तोडफोड केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने समंजसपणे भूमिका घेतली. त्यानंतर बाहेरुन कुमक आली तोपर्यंत तणाव शांत झाला. 51 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. महिला आणि अल्पवयीन लोकांना अटक करण्यात आली नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.
