मागील चोवीस तासांपासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आता अखेर पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पोलीस पथकं रवाना झाली होती. आरोपींचा सर्वत्र शोध घेतला जात होता. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. त्याला पुण्यातून बेड्या ठोकल्याची माहिती आहे. प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला होता.
advertisement
यानंतर अखेर २४ तासांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर जिथे भाड्याच्या घरात राहत होती. त्या घराचा मालक प्रशांत बनकर होता. मागील काही दिवसांत त्याने महिला डॉक्टरचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप आहे.
कुठे लपला होता प्रशांत बनकर?
मिळालेल्या माहितीनुसार, फलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यापासून प्रशांत बनकर फरार झाला होता. तो थेट पुण्यात आला. इथं तो एका मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसला होता. मागील काही तासांपासून तो इथेच मुक्कामी होता. मात्र पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटे चार वाजता संबंधित फार्महाऊसवर छापेमारी केली. यावेळी तिथे प्रशांत बनकर पोलिसांना आढळला. ग्रामीण पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली. याच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येतायत का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
