संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची एक भूमिका आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसतेय. ज्या अर्थी मोदींना 10-11 वर्षानंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही. भाजप अध्यक्ष नड्डा यांनी संघाची गरज नाही अशी भाषा केली होती. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती पंतप्रधान मोदींचीच भूमिका असते. हे जेव्हा तुम्ही समजून घेता, तेव्हा मोदींना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे, असं राऊत म्हणाले. आपल्या सहकाऱ्यांसाठी, भाजपसाठी धोरण केलं आहे, की 75 व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल. आता मोदींजींनाही केदारनाथच्या गुंफेत जावं लागेल, असेही राऊत यांनी म्हटले.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचा दावा फेटाळून लावला आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
मोदींच्या वारसदाराची चर्चा का?
भाजपमध्ये वयाची 75 वर्ष ओलांडलेल्या नेत्यांनी दूर करून नवीन पिढीला संधी दिली जाते. याच नियमानुसार, भाजपमधील अनेक नेत्यांना पदावरून दूर करण्यात आले. तर, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत काहींना उमेदवारीदेखील नाकारण्यात आली. पंतप्रधान मोदी हे लवकरच वयाची 75 वर्ष पूर्ण करणार आहेत.
