नेमकी घटना काय?
देविदास सस्ते (४४) असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते मूळचे कल्याणचे रहिवासी असून सहार वाहतूक विभागात कर्तव्य बजावत होते. बुधवारी आपली ड्युटी संपवून ते नेहमीप्रमाणे अंधेरीहून कल्याण येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. घाटकोपर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून त्यांनी दुपारी ४:१५ च्या सुमारास टिटवाळा धीम्या गतीची लोकल पकडली. ते प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होते.
advertisement
लोकल घाटकोपर स्थानकातून सुटल्यानंतर मुलुंड स्थानक येण्यापूर्वी, दरवाज्याजवळ उभे असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते धावत्या लोकलमधून खाली रुळांवर कोसळले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
महत्त्वाची बाब म्हणजे देविदास सस्ते हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या हृदयात चार ब्लॉकेज आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर ऑपरेशन करावं लागलं होतं. जवळपास चार महिने उपचार घेतल्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते पुन्हा एकदा सेवेवर हजर झाले होते. सगळं काही सुरळीत झालं होतं. हृदयात चार ब्लॉकेज असूनही ते मृत्यूशी झुंज देण्यात यशस्वी झाले होते. मात्र बुधवारी दुपारी अचानक त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला. एका पोलीस कर्मचाऱ्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
