प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
नांदेडमध्ये सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची प्रेम प्रकरणातून अमानुषपणे हत्या करण्यात आली. मुलीच्या कुटुंबियांचा जातीमुळे ह्या प्रेम प्रकरणाला विरोध होता म्हणून जातीय द्वेषाने या तरुणाची हत्या करण्यात आली. अत्यंत क्रूरपणे हे सर्व घडवण्यात आले.
या प्रकरणी मुलीने घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. सक्षम ताटे या तरुणाच्या हत्येनंतर तरुणीने त्याच्या मृतदेहाशी विवाह करत असल्याची घोषणा केली आणि आरोपी कुटुंबियांना अटक करण्याची मागणी केली. आम्ही तरुणीच्या या धाडसाचे दाद देतो. आम्ही खंबीरपणे पीडित कुटुंबीय आणि तरुणीच्या सोबत उभे आहोत,असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
advertisement
पोलिसांनी सक्षमविरोधात माझ्या भावाला भडकवले, आंचलचा आरोप
सक्षम ताटे याचे आंचलशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आंचलच्या कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि हिमेश मामीडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशीचे तुकडे डोक्यात घालून त्याचा खून केला. गुरुवारी हे सगळे प्रकरण समोर आले. पोलिसांनी सक्षमविरोधात माझ्या भावाला भडकवले, असा आरोप आंचलने केला आहे.
त्या मुलाला तुम्ही मारून का टाकत नाही? पोलीसच भावाला बोलला
ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली, त्या दिवशी माझा भाऊ सकाळी त्याच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी मला पोलिस ठाण्यात घेऊन गेला होता. मी कोणताही गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. पोलिसांनी माझ्या भावाला सांगितले की खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी, आणि आमच्याकडे येण्यापेक्षा त्या मुलाला तुम्ही मारून का टाकत नाही? माझ्या भावाने ते पोलिसांचे म्हणणे मनावर घेतले. त्याला मारूनच तुमच्याकडे येतो, तोवर तोंड दाखवणार नाही, असे म्हणून तो पोलीस स्टेशनमधून निघाला. त्याने सक्षमवर नजर ठेवून त्याची हत्या केली..." असे आंचलने सांगितले.
