राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरून अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच विमान कंपनीच्या कारभारावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अजित पवार गाडीने प्रवास करणार होते पण त्यांना एका नेत्याच्या भेटीमुळे उशीर झाला आणि त्यांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांच्या याच दाव्याला प्रमोद हिंदुराव यांनी पुष्टी दिली.
advertisement
मंत्रालयातील फाईल संदर्भात फोन, फाईल यायला उशीर झाल्यानेच प्रवासाचा निर्णय बदलला
प्रमोद हिंदुराव म्हणाले, प्रफुल पटेल यांच्या फोननंतर अजितदादांनी प्रवासाचा निर्णय बदलला. प्रफुल पटेल यांचा मंत्रालयातील फाईल संदर्भात फोन आल्यानंतर दादांनी ‘बाय रोड’ जाणे रद्द केले.
त्यांच्या फाईलवरील सहीला उशीर झाल्यानेच त्यांनी विमान प्रवासाचा निर्णय घेतला.
गाडीत बॅगा ठेवल्या होत्या पण...
अजित पवार यांचे बाय रोड जाण्याचे ठरले होते. सर्व बॅगा गाडीत टाकल्या. परंतु त्याचवेळी प्रफुल पटेल की आणखी कुणाचा फोन दादांना आला. मंत्रालयात एक फाईल अडकली आहे. त्याच्यावर सही हवी आहे. म्हणून अजित पवार यांनी सचिवाला फोन केला, ती फाईल लवकर घेऊन ये, पुन्हा मी आठवडाभर नाहीये, असे त्यांनी सचिवाला सांगितले. परंतु फाईल आणायला साडेसात आठ वाजले. मग उशीर झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितले की मी विमानाने जातो. गाडीतल्या बॅगा त्यांनी परत काढल्या, असे प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले.
तो फोटो त्यांचा अखेरचा ठरला
तसेच अजित पवार यांचा अंगरक्षक कधीच अजितदादांच्या शेजारी विमानात बसला नव्हता. तो पहिल्यांदाच विमानात दादांच्या शेजारी बसला, तो फोटो त्याने त्याच्या घरच्यांना पाठवला. तोच फोटो त्यांचा अखेरचा ठरला, असेही प्रमोद हिंदुराव म्हणाले.
