मिरजेत सर्वाधिक जागा जिंकून भाजप सत्तेपासून दूर, शिंदेसेनेची मविआला साथ
सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी अवघ्या २१ वर्षांची तन्वी सुनील कमलेकर यांची निवड झाली. शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. याकामी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली. सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात मिरजेत भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले. पंचायत समितीच्या २२ जागांपैकी १० जागांवर भाजपचे सदस्य जिंकून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादी शरद पवार गट ४, काँग्रेस आणि अजित पवार गट ३ तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २ जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीत समीकरणे जुळवून आणेल, अशी चर्चा असताना मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली.
advertisement
जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेनेत युती
जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही सत्तेसाठी एकत्र आल्या. सभापतीपदी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कमल शेळकंदे विराजमान झाल्या तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे पक्षाचे अमित ढोले यांची निवड झाली.
शिंदेंच्या शिवसेनेचे आठ सदस्य निवडून आले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा सदस्य विजयी झाले. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला. त्यामुळे जुन्नर पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. शिंदेसेनेला सत्ता मिळविण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची किंवा भाजपचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र, शिंदेसेनेने भाजपचा पाठिंबा न घेता ठाकरे सेनेचा पाठिंबा घेऊन सत्ता मिळवली.
हवेलीत भाजपची मदत घेणे पसंत नाही, अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली
पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हवेली पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत अपक्ष उमेदवाराच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली. सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्या विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी ७ सदस्यांची गरज होती. निवडणुकीत राष्ट्रवादीने ६ जागांवर तर भाजपने ४ विजय मिळवला. शिंदेसेना आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. यामध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागेची आवश्यकता होती. अपक्षाची मदत घेऊन राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. त्यांनी भाजपची मदत घेणे पसंत केले नाही.
