अमोल बालवडकर हे बाणेर-बालेवाडीमधून इच्छुक होते. विशेष म्हणजे याच प्रभागातून २०१७ ते २०२२ काळात ते नगरसेवक राहिले. तरीही पक्षाने त्यांना उमेदवारीसाठी शेवटपर्यंत झुंजवले. निष्ठावंत असूनही पक्षाने दिलेल्या वागणुकीमुळे बालवडकर दुखावले गेले. त्यांनी अजित पवार यांना फोन करून पक्ष प्रवेशाची बोलणी केली. मंगळवारी दुपारी त्यांनी मनगटावर घड्याळ बांधले.
चंद्रकांत पाटील यांना नडल्यानेच बालवडकर यांचे तिकीट कापले?
advertisement
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी अमोल बालवडकर हे इच्छुक होती. पक्षाकडे उमेदवारीसंदर्भात त्यांनी बोलणीही केली होती. परंतु पक्षाने चंद्रकांत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. या सगळ्यात बालवडकर-चंद्रकांत पाटील यांच्यात छुपे युद्ध सुरू झाले. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी बालवडकर यांची समजूत काढून पुढील काळात न्याय देतो, असा शब्द दिला. परंतु महानगरपालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी डालवून उट्टे काढल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे.
गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु उमेदवारांच्या नावांची घोषणा न झाल्याने वाट पाहावी लागेल, असे पक्षाकडून त्यांना सांगण्यात आले. अर्ज भरायला २४ तास उरलेले असतानाही पक्षाकडून त्यांना कोणताही निरोप न आल्याने बालवडकर यांनी अजित पवार यांना संपर्क करून उमेदवारी मागितली. अजित पवार यांनीही तत्काळ होकार दर्शवला.
पक्षप्रवेशानंतर बालवडकर काय म्हणाले?
पक्षाने माझ्यासोबत दगा फटका केला. शेवटच्या क्षणांपर्यंत मला झुंजवले. ऐनवेळी मला तिकीट नाकारले. त्यानंतर मी अजित पवार यांना संपर्क करून बोलणी केली. त्यांनीही मोठ्या मनाने प्रवेश देऊन उमेदवारी दिली. यात माझे काहीही नुकसान झालेले नाही, पक्षाचे नुकसान झाले, असे बालवडकर म्हणाले.
