या प्रकरणी पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरसह एकूण १२ ते १३ जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आंदेकर टोळीचे प्रमुख सदस्य तुरुंगात असले तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आंदेकर टोळी निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. आम्हाला निवडणुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. याला कोर्टाने परवानगी दिली होती. कोर्ट कुणालाही निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं.
advertisement
त्यामुळे आंदेकर कुटुंबाचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता वनराज आंदेकरांच्या पत्नी सोनाली आंदेकर निवडणूक लढण्याच इच्छुक आहेत. त्यांनी तशी तयारी सुरू केल्याची माहितीही समोर आली आहे. एकीकडे आंदेकर कुटुंब निवडणूक लढण्याची तयारी करत असताना आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओत कल्याणी कोमकर आंदेकर कुटुंबाला तिकीट न देण्याची विनंती करत आहे. आंदेकरांना तिकीट दिलं तर राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी केला आहे. कल्याणी कोमकर यांच्या या मागणीमुळे आंदेकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आधीच आंदेकर टोळीचा म्होरक्या तुरुंगात असताना निवडणूक लढण्यास येणाऱ्या अडथळ्यांमुळे आंदेकर कुटुंब राजकारणातून देखील नेस्तनाबूत होऊ शकतो, असं बोललं जात आहे.
कल्याणी कोमकर नक्की काय म्हणाल्या?
"सर्वपक्षीय नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे. मला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण करू नका. आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका. कारण त्यांनी माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. सत्तेची ताकद त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते आज इतक्या थराला पोहोचले. तर प्लिज असं नका करू. त्यांना तिकीट देऊ नका. मी विनंती करते. जो पक्ष त्यांना तिकीट देईल, त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेन. माझ्या मुलाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे," असंही कोमकर म्हणाल्या.
