पुण्यातील सासू आणि सून यांच्यातील वादाचा संबंध केवळ घरगुती भांडणांपुरता मर्यादित न राहता धार्मिक परंपरांपर्यंत गेला. सुनेच्या ताब्यात असलेल्या बंगल्यात देवघरातील पारंपरिक टाक आणि मूर्ती आहेत. घटस्थापनेच्या निमित्ताने त्यांची पूजा करण्याचा अधिकार आपल्याला मिळावा, अशी मागणी सासूने कोर्टात केली होती.
advertisement
सासूने कोर्टात दावा दाखल करताना सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. सुनेने घरगुती भांडणाच्या पार्श्वभूमीवर पती आणि सासूला घराबाहेर काढून बंगला बळकावला असल्याचं सासूचं म्हणणं आहे. तसेच, सुनेच्या कथित शारीरिक आणि मानसिक छळामुळे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळावे, अशी मागणीही सासूने केली. त्यासाठी महिलांचं संरक्षण कायदा 2005 अंतर्गत विविध कलमांचा आधार घेतला गेला. कलम 19 (3) नुसार बंगल्यात सुरक्षित वास्तव्याचा अधिकार मिळावा आणि कलम 18 (अ) व (ड) नुसार सूनेने प्रत्यक्ष किंवा फोनवरून धमक्या देऊ नये, असा युक्तीवाद सासूच्यावतीने करण्यात आला.
या प्रकरणातील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाला. सुनेच्या वकिलांनी सासूबाईंनी घरी येऊन घटस्थापना करावी, असा युक्तिवाद केला. मात्र, सासू मागील 40 वर्षांपासून देवाचे टाक आणि मूर्ती पूजत असल्याचा मुद्दा ॲड. जान्हवी भोसले आणि ॲड भालचंद्र धापटे यांनी मांडला. त्यावर कोर्टाने सासूची बाजू मान्य करत तिला तात्पुरता दिलासा दिला आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. एस. कवडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, सासूला घटस्थापनेच्या दिवशी देवाचे टाक आणि मूर्ती पूजेसाठी मिळतील. याशिवाय, सून राहात असलेल्या बंगल्यात सासू व पतीच्या असलेल्या वस्तूं हस्तांतरित करण्याबाबत दोन्ही पक्षांनी कोर्टात माहिती सादर करावी, अशा सूचनाही दिल्या.
पुढील सुनावणीत या वादाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, सध्या तरी सासूला देव मिळाल्याने तिला घटस्थापनेच्या निमित्ताने परंपरा टिकवता येणार आहे. भारतीय समाजात घरातील देवघराला धार्मिक महत्त्व तर आहेच शिवाय त्याला भावनिक ओलावा देखील आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली असून. घरगुती वाद किती खोलवर जाऊ शकतात, याचं हे प्रकरण उदाहरण ठरलं आहे.