आईनेच मुलाच्या जीवाचा केला सौदा, सुपारी देऊन खेळ खल्लास, संभाजीनगरला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं सुपारी देऊन मुलाची हत्या केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं ३० हजारांची सुपारी देऊन आपल्या पोटच्या मुलाची हत्या घडवून आणली आहे. आरोपी महिलेनं आपला जावई आणि मुलाच्या मित्रालाच सुपारी दिली होती. दोघांनी मिळून तरुणाची निर्घृण हत्या केली होता. आता अखेर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
२६ जानेवारी रोजी एकभुर्जी वाघलगावजवळील शहानवाजपूर शिवारात एका विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला होता. मृताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे होते. आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे हा खून केला होता. मृतदेह पांढऱ्या पन्नीमध्ये गुंडाळून, त्यात दगड भरून तो दोरीने बांधून विहिरीत फेकून दिला होता, जेणेकरून तो वर येऊ नये. पण परिसरात पसरलेली दुर्गंधीमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. २७ जानेवारी रोजी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
पँट आणि DNA मुळे पटली ओळख
तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली. मृताच्या अंगावरील पँटवरून काही धागेदोरे मिळाले. पोलिसांनी संशयित नातेवाईकांना घाटी रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी बोलावले, मात्र सुरुवातीला त्यांनी ओळखण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी मृताच्या आईचा DNA नमुना घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठवला. अहवाल आल्यानंतर मृताची ओळख निश्चित झाली आणि तपासाला गती मिळाली.
advertisement
असा रचला खुनाचा कट
पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. मृत मुलगा दारु पिऊन सतत त्रास देत असल्याने वैतागलेल्या आईनेच त्याचा काटा काढण्याचे ठरवले. तिने आपला जावई कमलसिंग सिंगल आणि मुलाचा मित्र गोरख शेकु आहिरे यांना खुनाची सुपारी दिली. यासाठी गोरखला ३० हजार रुपये देण्यात आले होते.
२३ जानेवारी गोरखने मृताला पोटुल रेल्वे स्टेशनवरून बोलावून घेतले. त्याला वाघलगावजवळील निर्जन रस्त्यावर नेले आणि तेथे जावई कमलसिंगलाही बोलावले. दोघांनी मिळून मृताला भरपूर दारू पाजली. नशेत असताना लोखंडी रॉडने डोक्यात आणि शरीरावर वार करून त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गोरख आहिरे आणि कमलसिंग सिंगल यांना बेड्या ठोकल्या आहेत. आईनेच मुलाच्या हत्येचा कट रचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 6:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईनेच मुलाच्या जीवाचा केला सौदा, सुपारी देऊन खेळ खल्लास, संभाजीनगरला हादरवणारी घटना!









