रबज्योत सिंह ऊर्फ गब्या असं या कुख्यात गुंडाचं नाव आहे. त्याच्या सिनेस्टाईल अटकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला गब्या पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला असून, त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली होती की, संशयित गुन्हेगार रबज्योत सिंह हा भगतसिंह रस्त्यावरील निधानसिंह कॉलनीतील आपल्या घरी लपला आहे. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता त्याच्या घराला वेढा घातला.
advertisement
पोलिसांना आपल्या घराबाहेर पाहून गब्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तो थेट छतावर पळाला. पोलिसांनीही तत्काळ छतावर चढून त्याला शरण येण्याचा इशारा दिला. मात्र, पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही गब्या थांबला नाही. उलट त्याने पोलिसांवरच पिस्तूल रोखले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
परिणामी, पोलीस अंमलदार गणेश धुमाळ यांना बचावात्मक कारवाई करावी लागली. अंमलदार धुमाळ यांनी गब्याच्या दिशेने गोळी झाडली. पोलिसांनी त्याच्या पायाच्या दिशेने गोळी झाडली होती, परंतु जीव वाचवण्यासाठी गब्या खाली वाकल्यामुळे ती गोळी त्याच्या कमरेला लागली.
गोळी लागल्यामुळे जखमी झालेल्या अवस्थेत पोलिसांनी रबज्योत सिंह ऊर्फ गब्याला ताब्यात घेतले आणि तातडीने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांवर पिस्तूल रोखल्याने गोळीबार
या थरारक घटनेनंतर, पोलीस अंमलदार गणेश धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. रबज्योत सिंह ऊर्फ गब्यावर स्थानिक नागरिकांना धमकावणे, खंडणी उकळणे, गुन्हेगारी टोळ्यांमार्फत वसुली आणि प्राणघातक हल्ला यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो दीर्घकाळापासून फरार होता, त्यामुळे त्याची अटक ही पोलिसांसाठी मोठी कामगिरी मानली जात आहे. गब्याच्या अटकेमुळे नांदेडमधील गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे.
