नाशिक पोलीसांच्या नाकावर टिच्चून महिलांचे लैंगिक शोषण होत असताना नाशिक गुप्तचर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा काय करत होती? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलाय. कॅप्टन खरात विरोधात शिर्डी पोलीसांनी केलेल्या कामगिरीमुळे आज आरोपी गजाआड झाला असल्याचे म्हणत शिर्डी पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा नेमका आक्षेप काय, नाशिक पोलिसांवर त्यांचा राग का?
advertisement
कॅप्टन खरात प्रकरणी 18 फेब्रुवारीला शिर्डीत नीरज जाधव याच्यावर एका तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर शिर्डी पोलिसांना कॅप्टनच्या लैंगिक शोषणाचा अमानवीय प्रकार समोर आला. केवळ गुन्हा दाखल करण्यासाठी शोषित महिला समोर आल्या नाही, त्यामुळे हा गुन्हा शिर्डीत दाखल झाला नाही. मुख्यमंत्र्यांना शिर्डी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची सर्व माहिती दिल्यानंतर कॅप्टनला लुक आऊट नोटीस बजावली गेली. त्यामुळे तो परदेशात पळून जाऊ शकला नाही, असा दावा करीत नाशिक गुप्तचर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभारावर विखे पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीकडून चौकशी
भोंदूबाबा अशोक खरात याला बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटक केली. खरातच्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याने किती महिलांवर अत्याचार केले आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच खरात याच्या चौकशी करिता तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.
तेजस्वी सातपुते यांच्याकडून 'कॅप्टन'ची दोन तास चौकशी
एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अशोक खरात याची तब्बल दोन ते तीन तास कसून चौकशी केली. त्याच्याकडे असलेल्या पॅनड्राईव्हबाबतही त्यांनी विचारपूस केल्याचे कळते.
