कलाटे हे मागील आठवड्यातच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण त्यांना भाजपमधील काही नेत्यांचा विरोध होता. ते भाजपात आले तर प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवतील, त्यामुळे याच प्रभागातून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता. यात पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगतापांसह शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा समावेश होता. आता अखेर कलाटे यांच्या पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
राहुल कलाटे हे पिंपरी-चिंचवडमधील एक प्रभावी नाव आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील गटनेते म्हणून त्यांची आजपर्यंतची ओळख राहिलेली आहे. स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क आणि आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग शहरात आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०२४ च्या निवडणुकीतील तगडी फाईट
नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्याविरुद्ध कडवी झुंज दिली होती. या चुरशीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला असला तरी, कलाटे यांनी घेतलेली मते लक्षणीय होती. असा बडा नेता साथ सोडत असल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
