ऑक्टोबर २०२४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांना पराभूत केले. वर्षभर राहुरीचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांनी चांगले काम केले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ त्यांना सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागले. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर सहा महिन्यात निवडणूक घेणे आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे आयोगाने संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
advertisement
एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार, दावे हरकती कधीपर्यंत घेता येणार?
यानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान ठेवण्यात आला आहे.
प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
