‘रेल मदत’ हे रेल्वेचे अधिकृत तक्रार निवारण अॅप असून, प्रवासादरम्यान उद्भवलेली कोणतीही अडचण प्रवाशांनी या अॅपवर नोंदवता येते. तक्रार नोंदवल्यानंतर ती थेट संबंधित विभाग, ऑनबोर्ड स्टाफ, व्यवस्थापक किंवा कंट्रोल रूमकडे पाठवली जाते. त्यामुळे अवघ्या 5 ते 10 मिनिटांत तक्रारीची दखल घेतली जाऊन समस्येच्या निराकरणाची प्रक्रिया सुरू होते.
या अॅपच्या माध्यमातून वैद्यकीय मदत, चोरी व सुरक्षिततेशी संबंधित तक्रारी, रेल्वेतील अस्वच्छता तसेच कर्मचाऱ्यांविषयीच्या तक्रारी नोंदवता येतात. प्रवासादरम्यान प्रवाशाची तब्येत बिघडल्यास 24 तास कार्यरत असलेल्या वैद्यकीय टीमकडून मदत दिली जाते. डॉक्टर किंवा मेडिकल टीम पुढील स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येते आणि गरज भासल्यास प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाते.
advertisement
सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ‘रेल मदत’ अॅप उपयुक्त ठरत आहे. सामान चोरी, संशयास्पद व्यक्ती आढळणे, महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील तक्रारी या अॅपवर नोंदवता येतात. तसेच डबे, शौचालये, प्लॅटफॉर्मवरील घाण, पाणी साचणे अशा अस्वच्छतेच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाते. कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तनाबाबतही प्रवासी तक्रार दाखल करू शकतात.
तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित विभागाकडून साधारण 10 मिनिटांत प्रवाशाशी फोनद्वारे संपर्क साधला जातो आणि आवश्यक उपाययोजना केल्या जातात. तक्रारीचे लाइव्ह स्टेटस अॅपवर पाहता येते. समस्या सुटल्यानंतर प्रवाशांकडून फीडबॅकही घेतला जातो, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहते.
‘रेल मदत’ अॅप वापरण्यासाठी प्रवाशांनी मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड करून लॉग-इन करावे. पीएनआर क्रमांक टाकून तक्रारीचा प्रकार निवडून तक्रार नोंदवता येते. तक्रारीचे लाइव्ह ट्रॅकिंगही अॅपवर उपलब्ध आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय रेल्वेने ‘रेल मदत’ अॅपच्या माध्यमातून तक्रारींचे जलद, पारदर्शक आणि प्रभावी निवारण सुरू केल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
