निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिलीच जाहीर सभा घेतली. या सभेत राज्यातली आणि देशातली सध्याची राजकीय परिस्थिती, इराण इस्त्रायल युद्ध, मुंबई महापालिका निकाल, मनसेची आतापर्यंतची वाटचाल अशा विषयावर राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका मांडली. इराण इस्त्रायल युद्धावर भूमिका मांडताना भारत सरकारच्या चुकीच्या भूमिकेवर त्यांनी प्रहार केला.
राज ठाकरे काय म्हणाले?
advertisement
भारताला इराण रूपयामध्ये तेल देत होता किंवा देत आला आहे. असे असताना इराणचे नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाचा साधा निषेधही केला नाही. किंबहुना अमेरिका-इस्राईल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याबद्दल काही बोललेही नाहीत. जो देश जम्मू-काश्मीरच्या प्रश्नासंदर्भात भारताला पाठिंबा देत आला, त्या देशाच्या अडचणीच्या काळात आपण मागे उभे राहायला हवे होते, अशी खंत व्यक्त करीत भविष्यात निश्चित आपल्याला याचा त्रास होईल, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
नेहमी नॉर्मलवर असणारे लोक सध्या गॅसवर आहेत
राज ठाकरे यांनी गॅस सिलेंडर टंचाई आणि गॅस दरवाढीवरही भाष्य केलं.देशात आज गॅसबद्दल धाकधूक असून अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. नेहमी नॉर्मलवर असणारे लोक सध्या गॅसवर आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
करमणुकीच्या गटारगंगेतून बाहेर पडा, उद्याचा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे
शिवाजी पार्कवरील पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांच्या वाढच्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली. लोक करमणुकीत अडकले असून मोबाईलचे व्यसन सोडून राज्यातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. फक्त मोबाईलवर आक्रोश करून चालणार नाही, करमणुकीच्या गटारगंगेतून बाहेर पडा, उद्याचा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, असे राज म्हणाले.
